कर्जत – युवा नेते रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याविरूद्ध त्यांची लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोहित पवार यांनी पदयात्रा काढून सभा घेत मोठे शक्तिप्रदर्शन केले. कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराजांचे दर्शन घेवून आक्काबाई मंदिरापासून पदयात्रा काढली. पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शेवाळे, प्रवीण घुले, सूर्यकांत मोरे, अशोक जायभाय, किरण पाटील, बाळासाहेब साळुंके, भास्कर भैलुमे आदींची भाषणे झाली. वंचित बहुजन आघाडीचे भास्कर भैलुमे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मराठा महासंघाने पाठिंबा जाहीर केला.
पिवळा शर्ट अन् घोंगडी
रोहित पवार यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यात एका कार्यकर्त्याने घोंगडी व काठी भेट देऊन भर घातली. पदयात्रेदरम्यान वादकांनीही पारंपारिक धनगर समाजाचा वेष परिधान केला होता. भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांना शह देण्यासाठी हे ब्रॅण्डिंग केल्याची चर्चा सभास्थळी होती.