दौंडमध्ये बंडखोरीची लागण

राष्ट्रवादीचे आनंद थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल

दौंड – दौंड विधानसभा मतदारसंघातून भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले धनगर समाजाचे नेते आनंद कृष्णाजी थोरात यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करीत कुठलाही गाजावाजा न करता गुरुवारी (दि. 3) उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व रासप या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे आनंद थोरात हे पुत्र असून दौंड तालुक्‍याच्या राजकारणातील संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तालुक्‍यातील धनगर समाजास इतर समाजातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दौंड तालुक्‍यात रासपकडून आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीकडून माजी आमदार रमेश थोरात हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दौंड तालुक्‍यात आनंद थोरात यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांचे समर्थक करत होते. मात्र, बुधवारी (दि. 2) रात्री राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत रमेश थोरात यांना उमेदवारी दिल्याने अचानकपणे आनंद थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दसऱ्याला भूमिका स्पष्ट करणार
मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करत आहे. मात्र, सातत्याने आम्हाला डावलले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मी वैयक्तीक रित्या घेतला असून माझी पुढची भूमिका मी दसऱ्याला म्हणजे मंगळवारी (दि. 8) जाहीर करणार असल्याचे आनंद थोरात यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)