जळगाव – “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …लढ़ेंगे और जीतेंगे”, असे ट्विट एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केले आहे.
मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …
लढ़ेंगे और जीतेंगे ✊✊
@NCPspeaks pic.twitter.com/XqHrrnJFol— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 6, 2024
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे स्वगृही अर्थात भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. येत्या 9 ते 10 एप्रिलला ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ खडसे यांनीही माध्यमांशी बोलताना भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असेही रोहिणी खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
लवकरच राज्यभरात महिला मेळाव्यांचे आयोजन करत झंजावती दौरा करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी माहिती दिली. लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी महिलांची सक्षम ताकद उमेदवारांच्या पाठीमागे उभी करणार असल्याची भूमिका रोहिणी खडसे यांनी घेतली आहे.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहिणी खडसे काय करणार याची उत्सुकता होती. आता रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यावर स्पष्टीकरण दिले असून आपण शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एकनाथ खडसे होते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक –
एकनाथ खडसे हे 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद दिले. त्यामुळे नाराज असलेले खडसे विरुद्ध फडणवीस असा भाजपमध्ये संघर्ष सुरु झाला. पुढे खडसेंवर भोसरी एमआयडीसीतल्या जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले. अखेर पक्षांतर्गत संघर्ष टोकाला गेल्यावर खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्याचसोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून रावेरमधून त्यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता खडसे हे पुन्हा भाजपसोबत येत असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया –
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला एकनाथ खडसेंबाबत काहीच माहिती नाही. त्यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. आज सकाळीच रोहिनी खडसेंची भेट झाली होती. रोहिनी खडसे आणि मी जवळपास एक तास सोबत होतो. त्यांनी मला खडसेंची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाची अडचण सुरु आहे. त्यांच्यावर स्ट्रेस आणि टेंशन आहे. त्यामुळे आम्हालाही एकनाथ खडसे यांची काळजी असते. रोहिनी खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत काही भाष्य केलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया –
एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये परतण्याच्या बातमीवर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “केवळ आपला पक्षच आपला असतो, याची जाणीव एकनाथ खडसे यांना झाली असेल, त्यामुळे ते पुन्हा भारतीय जनता पक्षात येत असतील. एकनाथ खडसे जर महायुती सोबत परत आले तर त्यामुळे कोणत्याच पक्षातील कोणीही नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. झाला तर एकनाथ खडसे यांच्यामुळे महायुतीला फायदाच होईल.”