सातारा -सातारा शहरात करोनाचा वाढणारा संसर्ग धोकादायक पातळीच्या दिशेने निघाला आहे. शुक्रवारी रात्री प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात सर्वात जास्त एकूण 46 रूग्णांपैकी 23 रुग्ण सातारा तालुक्यात आढळून आले असून 23 पैकी नऊ रुग्ण सातारा शहरातील आहेत.
सार्वजनिक व्यवहारांची वेळ जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ घटवली तरी शेवटच्या एक तासात म्हणजे दुपारी दीडनंतर शहरात ट्रॅफिक जाम होत असून त्याचवेळी सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत लक्षणे नसणारे करोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. कॅमेरामन बाधित झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांपैकी आणखी तिघांचा अहवाल बाधित आल्याने राधिका रोडवरील अपार्टमेंट कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय एकाच कुटुंबातील तीन महिला व त्यांची आत्या बाधित असून त्यांचा सिव्हिलच्या रेकॉर्डला करंजे असा पत्ता देण्यात आल्याने पालिकेच्या करोना कक्षात संभ्रम निर्माण झाला. पालिकेचे प्रभारी कक्ष प्रमुख अक्षय साळुंखे यांनी संबंधित रुग्णांची चौकशी केली असता रुग्णाने आपले मूळ गाव आनेवाडीनजीक असल्याचे सांगितले. त्यामुळे करंजे येथे रूग्णांचा पत्ताच चुकीचा निघाल्याने करंजेकरांना हायसे वाटले. राधिका रोडवरील गार्डन सिटीमध्ये 31 वर्षीय “सारी’च्या रुग्णाला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे या इमारतीला दुसऱ्यांदा कंटेनमेंट झोनच्या यादीत जावे लागले. गेल्या महिन्यात याच इमारतीतील एका परिचारिकेला करोनाची बाधा झाल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य विभागाने बॅरिकेटिंग करून विमल सिटी व गार्डन सिटी हे दोन नवीन कंटेनमेंट झोन जाहीर केले. अग्निशमन यंत्रणेच्मार्फत सारा परिसर स्वच्छ धुवून तेथे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. करंजे पत्ता दिलेल्या संबधित महिलांच्या गावातील ग्रामसमित्यांना सतर्क करण्यात आले आहे.
सातारा तालुक्यातही फैलाव
सातारा तालुक्यातही करोनाने थैमान घातले आहे. भरतगावमध्ये एकाच कुटुंबामध्ये तब्बल सहा रुग्ण आढळल्याने गावात भयकंप उडाला आहे. दोनच दिवसांपूर्वी एका सोसायटीचा संचालक बाधित आढळला होता. त्यानंतर तालुक्यात हॉटस्पॉट ठरलेल्या जिहे गावात 19 वर्षीय युवक व 70 वर्षीय वृध्दा बाधित आढळून आले. तसेच करंडी गावात तीन महिला बाधित आढळल्या आहेत. त्यामुळे गावात सन्नाटा आहे. बोरगाव येथेही एकाच कुटुंबातील तीन सदस्य निकट संपर्कामुळे बाधित झाले आहेत. जिहे, चोरगेवाडी, करंडी, बोरगाव या गावातील ग्राम समित्यांशी आरोग्य यंत्रणेचा सातत्याने समन्वय सुरू आहे. सातारा तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या काही क्षेत्रांचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. एस पवार यांनी दौरा सुरू केला आहे. बाधित क्षेत्रात कंटेनमेंट झोनमध्ये नियम कसे कडक पाळले जातील याची काळजी कटाक्षाने घेतली जात आहे. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी या सर्व हॉटस्पॉटची दखल घेतली असून या भागातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.