देहू (रामकुमार आगरवाल ) : जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झालें आता ।। तुझ्या नादाने पाहिली मी। ही तुझीच रे पंढरी।। धन्य झालों आह्मी जन्माचे । नाम घेऊ तुझे आवडीचें ।। दीपवली तुझी पंढरी । चालू झाली भक्तांची वारी ।। तुका ह्मणे भक्ती करा तुझी । जाती पापें जन्माची पळोनी ।।
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आषाढीवारी 338 वा पालखी सोहळ्याचे 35 दिवसांच्या प्रवासानंतर गुरूवारी (दि.13) दुपारी तीनच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत आगमन झाले. देहूकरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे भक्तीमय आणि आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहाने स्वागत केले. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्यातील सहभागी विणेकरी, मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी यांना श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. भाविकांचेही आभार मानल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता
पहाटे नित्यपूजेनंतर पिंपरीगावातील भैरवनाथ मंदीरातून पालखी सोहळा वारकरी दिंडेकरी आणि भाविकांसह पालखी सोहळा पुणे-मुंबई महामार्गावरून तिर्थक्षेत्र देहूकडे मार्गस्थ झाला. उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड लष्कर भागातून देहूरोड पालखी मार्गाने चिंचोली येथील शनी मंदिराजवळ आल्यानंतर अभंग आरती झाली. देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे दुपारी तीनच्या सुमारास आगमन झाले. नभात मेघराजांनी घेर धरलेले होते. पालखीच्या स्वागतासाठी भाविक ,ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांकडून पालखीचे मोठ्या उत्साहाने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. उपस्थितांमध्ये महिलांची गर्दी लक्षणीय होती.
सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यासंह पालखी रथाच्या बैलजोडीला औक्षण केले. रामचंद्र तुपे कुटूबियांकडून वेशीजवळ दही भाताचा नैवद्य दाखविण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख हभप संजय महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, विश्वस्त हभप संतोष महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, शशिकांत मोरे, गणेश मोरे यांसह संस्थानचे माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज भाविक ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथ आल्यानंतर रथातून पालखी खांदेकऱ्यानी खांद्यावर घेतले. पालखीतील पादुकांच्या दर्शनासाठी ग्रामस्थ, भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चौकाजवळील हनुमान मंदीरा समोर संतपर अभंग झाले. पालखी मार्गाने सोहळा मुख्य मंदिराकडे निघाला. पालखीचे महाराजांच्या जन्मस्थाना समोर आरती झाली.
पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यावर चांदीची अब्दागिरी, गरूड टक्के, सावलीते रेशमी छत्र, पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. प्रदक्षिणेनंतर पालखी मंदिरातील भजनी मंडपात आल्यावर श्री विठ्ठल-रुख्मीणीच्या मंदिरात आरती झाली. त्यानंतर उपस्थित वारकऱ्यांनी “पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ नामाचा जयघोष करीत पताका उंचवून तुतारी, शंख, नगारा व ताशाच्या गजर नाद केला. यावेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना एकादशीचा फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.
पालखी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सोहळ्यातील सहभागी झालेल्यांचे संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले. पालखी सोहळ्याची आनंदाच्या व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. नेहमीपेक्षा भाविक व वारकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
पिंपरीगाव येथून पालखी सोहळा पुण्यनगरी देहूगावाकडे मार्गस्थ असताना पालखी मार्गावर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावरील वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.
ठिकठिकाणी खिचडीचे वाटप
दरम्यान, दुपारी चिंचोली येथील शनिमंदीर येथे संत तुकाराम अन्नदान मंडाळाच्या वतीने एकादशीनिमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष माजी स्वीकृत नगरसेवक आनंदा काळोखे, बाबा भालेकर,राजू बुचडे,माऊली गायकवाड, संदीप शिंदे, संतोष शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. पालखी मार्गावर पाणी,चहा, उपवासाचे खिचडी, राजगिरी लाडू तर स्व.अक्षय अग्रवाल कुटुंबीयांकडून भाविकांना साबुदाण्याचे वडे वाटप करण्यात आले.7