पुणे -दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी व्हावी, नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार दस्त नोंदविता यावे, यासाठी शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही पुणे शहरातील सहा दस्तनोंदणी कार्यालय सुरू असतात. त्याच धर्तीवर राज्यातील जिल्हा मुख्यालय आणि पालिका हद्दीतील दुय्यम निबंधक कार्यालयेही शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला.
खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही, दुय्यम निबंधक कार्यालयात वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी, यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, कोकण विभागातील ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड अलिबाग, पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती विभागातील अकोला, अमरावती, नागपूर विभागातील नागपूर, लातूर विभागातील लातूर, नांदेड, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव या जिल्ह्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तसेच सर्व पालिका हद्दीतील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवारी सुरू राहणार आहेत.