नगर – सूक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण भांडवल उभारणीसाठी सुरु केलेल्या क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो ऍण्ड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई) योजनेची मर्यादा दोन कोटींवरुन आता पाच कोटी रुपये करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरु झाली आहे. उद्योगांना पाच कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे.
यापूर्वी व्याजदर सोडून अधिकची दोन टक्के, काही ठिकाणी तीन टक्क्यांपर्यंत कर्जदाराला गॅरंटी शुल्क द्यावे लागत होते. गॅरंटी शुल्क कर्जदारांकडून न घेता बॅंकांकडून घेण्यासह विनातारण कर्जमर्यादा दोन कोटी होऊन पाच कोटी केली आहे. या योजनेसाठी योजनेचा अर्ज, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, बिजनेस रिपोर्ट, सीजीटीएमएसई लोन कव्हरेज पत्र, बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची कागदपत्रे, त्याचबरोबर ओळखपत्र, फोटो आणि बॅंकद्वारा इतर आवश्यक कागदपत्रे लागतात.
लघु व सूक्ष्म उद्योगांना, व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात या योजनेला अल्प प्रतिसाद असल्याची माहिती आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक जिल्ह्यात होत नसल्याने या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. बॅंकही कर्ज देण्यास हात आखडता घेत असल्यामुळे व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या योजनेकडे व्यवसायिकांना वळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पाच कोटी रुपयापर्यंत विनातारण कर्ज सूक्ष्म व लघु उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. पूर्वी बॅंकांकडून कर्ज घेताना तारण ठेवावे लागत होते. नव्या धोरणानुसार उद्योग व्यावसायिकांना विनातारण कर्ज मिळेल. आता ही कर्ज मर्यादा पाच कोटी केली आहे. युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.
वार्षिक शुल्कही कमी
या योजनेंतर्गत पूर्वी घेतल्या जाणाऱ्या वार्षिक शुल्कात देखील कपात करण्यात आली आहे. 10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 0.37 %, 10 ते 50 लाख कर्जासाठी 0.55. 50 लाख ते 1 कोटीच्या कर्जासाठी 0.60 %, 1 कोटी ते 2 कोटींच्या कर्जासाठी 1.2 टक्के, 2 कोटी ते 5 कोटींपर्यंत 1.35 % वार्षिक शुल्क आकारले जाते.