नवी दिल्ली – अफगाणिस्तानातून भारतात आणल्या जाणाऱ्या नागरीकांना पोलिओचा डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे.
जगातून पोलिओ निर्मुलन झाले असले तरी अजून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोनच देशांमध्ये पोलिओचे रूग्ण आढळून येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या विमानतळावरच हा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानातून भारतीय नागरीकांबरोबरच काही अफगाणि नागरीकही भारतात आणले जात आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या नागरीकांना पोलिओ डोस देण्यास विरोध केल्याने तेथे अजूनही अनेक नागरीकांचे पोलिओ लसीकरण झालेले नाही. त्यामुळे तेथील अनेक जण या रोगाला बळी पडले आहेत. अशीच स्थिती काही बाबतीत पाकिस्तानातही आहे.