काबूल – आंतरराष्ट्रीय महिला दिनी अफगाणिस्तानमधील महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांची मागणी तालिबान प्रशासनाकडे केली आहे. अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींना रोजगार आणि शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आल्यामुळे महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, अशी कैफियत अफगाणी महिलांनी तालिबानसमोर मांडली आहे.
केवळ महिलांसाठी विद्यापीठ किंवा संस्थेत जाण्याचे आणि स्वत:साठी काम करण्याचे स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय असल्याचे वजिहा या २२ वर्षीय अफगाण तरुणीने सांगितले. हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि आम्ही इस्लामिक अमिरातला महिलांवरील निर्बंध हटवण्याची, आणि अभ्यास करण्याची, शिकण्याची आणि काम करण्याची परवानगी देण्याचे आवाहन त्यांना करतो, असे ती म्हणाली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजधानी काबूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमधून महिलांनी आपल्या मागण्या मांडल्या. समाजाचा अर्धा भाग असलेल्या महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकार महिलांची संख्या लक्षणीय आहे.
प्रसार माध्यमांमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही अशा महिलेचा आवाज आहे जिचा आवाज अफगाणिस्तानच्या दूरच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत नाही, असे पत्रकार असलेली शबनम म्हणाली.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये असलेल्या महिला सामान्य महिला नाही, आणि तुमच्यासाठी या दिवशीचे अभिनंदन इतर देशांतील अभिनंदनापेक्षा वेगळे आहे. असे महिला हक्क कार्यकर्त्या फजिला म्हणाल्या. तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये सत्ता ताब्यात घेताना महिलांवर निर्बंध न घालण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र नंतर हे आस्वासन पाळले नाही. उच्च शिक्षण, रोजगार, सार्वजनिक जीवनातील स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याचे स्वातंत्र्यही या महिलांना नाकरण्यात आले आहे. याबद्दल अफगाणिस्तानमधील महिलांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.