इस्लामाबाद – पाकिस्तानला अफगाणिस्तानशी सशस्त्र संघर्ष नको आहे, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून खोस्त आणि पक्तिका या प्रांतांमधील दहशतवादी तळांवर बॉम्बहल्ले केले होते. त्यानंतर ही प्रतिक्रीया देण्यात आली आहे.
बळाचा वापर करणे हा अखेरचा पर्याय असतो. पाकिस्तानला अफगाणिस्तानशी सशस्त्र संघर्ष नको आहे, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.
अफगाणिस्तानला भारताबरोबरच्या व्यापारासाठी पाकिस्तानच्या हद्दीतून जो मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे, तो बंद करण्याचा इशाराही आसिफ यांनी अफगाणिस्तानला दिला आहे.
सीमापार दहशतवाद खूप मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे थेट कृतीद्वारे संदेश देणे आवश्यक होते. अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया यापुढे चालू दिल्या जाणार नाहीत, हे अफगाणमधील हंगामी सरकारच्या निदर्सनास आणून देणे गरजेचे होते, असेही आसिफ यांनी एका माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
सोमवारी, पाकिस्तानने गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे तेहरीक-ए-तालिबानच्या हाफिज गुल बहादूर गटाला लक्ष्य करण्याचे ऑपरेशन केले. दिनांक १६ मार्च रोजी मीर अली, उत्तर वझिरीस्तान येथे झालेल्या हल्ल्यासाठी आणि देशातील अनेक दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे ऑपरेशन होते.
अफगाण-भारत व्यापारासाठी पाकिस्तानने जो मार्ग उपलब्ध करून दिला आहे, तो बंद करण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे. जर पाकविरोधी दहशतवादी कारवायांना आळा घातला गेला नाही, तर या पर्यायाचा अवलंब केला जाईल, असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अफगाणिस्तानला दिलेल्या भेटीदरम्यान तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या कारवायांकडे तालिबानी प्रशासनाचे आपण लक्ष वेधले होते. टीटीपीला झुकते माप देण्यात येऊ नये, अशी अपेक्षाही केली होती, याचीही आसिफ यांनी आठवण करून दिली.