पुणे – पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी बोलण्याच्या ओघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणण्याऐवजी “क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आपण केलेल्या विधानाबद्दल अजित पवारांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. “माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,” असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी तात्काळ आपली चूक मान्य करत माफी देखील मागितली आहे. परंतु तरी देखील विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी एक व्हिडीओ ट्विट करत माफी मागण्याची मागणी केली. यावेळी तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका देखील केली आहे.
यावेळी तुषार भोसले म्हणाले, “वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार असा सवाल उपस्थित करत आर्चार्य भोसले यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय’.