पुणे – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 18 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या संमेलनाचे आयोजन जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले.उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींचे नाव घेत पवारांनी संसदेत जायची भीती वाटत असल्याचा टोला लगावला.
देशात दर दहा मैलांवर मराठी भाषा बदलत जाते. मराठी भाषेमधील हा फरक नसून भाषा समृद्धीचा दागिनाच आहे. मराठी भाषेचा विचार व्यवहारात आणावा, यासाठी जागतिक मराठी संमेलनाची संकल्पना मांडली. आज संत तुकारामनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन होत आहे, याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जगभरात पसरलेला मराठी माणूस एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. मराठी भाषेची वाढती भूक पुर्ण करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळभ म्हणाले.खासदार श्रीनिवास पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या तालमीत आपण घडल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या भाषणातील हाच धागा पकडून शरद पवार म्हणाले, माझ्या तालमीत सुशीलकुमार शिंदे घडल्याचे म्हणाले. मात्र, हल्ली मला या वाक्याची भिती वाटते. कारण काही महिन्यांपुर्वी माझे बोट पकडून कोणीतरी राजकारणात आल्याचे सांगितले. त्या वाक्याने आज देखील संसदेत जायला मला थोडी भीती वाटते, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांचे नाव घेता शरद पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, स्वागताध्यक्ष डॉ. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री यशवंतराव गडाख, रमाकांत खलप, दिग्दर्शक नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, उद्योजक अरूण फिरोदिया, डॉ. प्रमोद चौधरी आदीसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.