सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्याच्या यादीत आणखी एका करोनबाधित रुग्णाची भर पडली. साताऱ्यातील कर्करोगाचा रुग्णाला उपचारासाठी पुण्यात नेले असता तिथे तो पाँझिटिव्ह आला. त्याची नोंद सातारा जिल्ह्याच्या यादीत करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता ११९ झाली आहे.
आज रविवारी सकाळी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात मुंबईवरुन प्रवास करुन आलेला २३ वर्षीय युवक व पुण्यातून प्रवास करुन आलेला ८ मे ला विलगीकरण कक्षात दाखल केलेला ३६ वर्षीय पुरुष असे एकूण २ जण करोनाबाधित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले..
तसेच सातारा येथील ५० वर्षीय कॅन्सरपिडीत रुग्ण उपचारासाठी पुणे येथे गेला असता तो करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आयसीएमआर पोर्टलमध्ये सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात एकूण ३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
वरील अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित व्यक्तिंची संख्या ११९ झाली असून यापैकी ९७ जण उपचार घेत आहेत. ,२० जण करोनामुक्त होऊन घरी गेले. दोन करोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.