रिजेका हा कार्निव्हल क्रोएशियन बंदर रिजेका येथे होतो. हा कार्निव्हल रंग, परंपरा, संगीत, उत्साह, वेशभूषा, नृत्य, आनंदी वातावरण, जल्लोष, पार्टी, परेड, स्वादिष्ट भोजन आणि बऱ्याच मजेदार घटकांनी परिपूर्ण आहे. जगातील प्रसिद्ध उत्सवांपैकी हा एक आहे. या वर्षी 17 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत हा कार्निव्हल साजरा केला गेला. कार्निव्हलला प्राचीन परंपरा असून वाईट आत्म्यांना नष्ट करून शहरात चांगले वातावरण निर्माण व्हावे, असा हेतू आहे. कार्निव्हलमध्ये सुमारे दीड लाख प्रेक्षक आणि हजारो मुखवटा घातलेले लोक सहभागी होतात. मुलांच्या परेडमध्ये पाच हजार मुले सहभागी होतात.
रिजेका येथे कार्निव्हल हंगामाच्या सुरुवातीस चिन्हांकित म्हणून सेंट अँथनीचा हॉर्न शहरभर वाजवला जातो. कार्निव्हलच्या दुसऱ्या दिवशी सेंट अँथनीचा हॉर्न वाजविल्यानंतर कार्निव्हल ध्वज फडकावला जातो आणि कार्निव्हलला अधिकृत सुरुवात झाली असे मानले जाते. रिजेकाचे महापौर शहराच्या चाव्या मास्टर ऑफ कार्निव्हलला देतात. कार्निव्हलमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धाही घेतल्या जातात.
रिजेका कार्निव्हलच्या शेवटच्या दिवशी शहराच्या चाव्या शहरातील महापौरांकडे परत दिल्या जातात.
कार्निव्हल ध्वज उतरवला जातो, तेव्हा रिजेका कार्निव्हल अधिकृतरित्या समाप्त होतो. हा कार्निव्हल प्री-लेन्टेन ख्रिश्चन उत्सव आहे. ज्याकाळापासून सर्बियन आदिवासी वसंत ऋतू साजरे करीत असत, ती परंपरा कार्निव्हलमध्ये अजूनही सुरू आहे. “मरा पण कधीही हार मानू नका’ हे कार्निव्हलचे बोधवाक्य आहे. कार्निव्हलमध्ये काही गट त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच भयानक मुखवटा आणि प्राण्यांच्या कातडीसारखी वेशभूषा करतात. ते दुष्ट आत्म्यांना दूर पिटाळण्यासाठी झ्वोंकरी बेल (घंटा) वाजवतात. ही परंपरा ख्रिस्तीपूर्व काळापासून असून यामुळे या भागात दरोडे घालणाऱ्या तुर्की चोरांना भीती वाटत असे. राणीचा मुकुट देऊन कार्निव्हल सुरू होतो. प्रत्येक वर्षी कार्निव्हल क्वीनची निवड सर्व वयोगटातील महिलांमध्ये केली जाते.
कार्निव्हल चॅरिटीला युरोपमधील मान्यवर लोक उपस्थित राहतात. कार्निव्हल परेडच्या आठवड्यापूर्वी पॅरिस रॅली रिजेका येथे असलेल्या पॅरिस नावाच्या उपनगरामध्ये काढली जाते. हे जगातील प्रसिद्ध पॅरिस-डा कार मोटर रेसिंगचे विडंबन आहे आणि सर्व सहभागी चालक, आणि रेफरी मुखवटे परिधान करतात. कार्निव्हलमध्ये स्नोबोर्डिंग स्पर्धा घेतली जाते. कार्निव्हल परेड मुख्य टप्प्यावर पोहोचल्यावर संपते. ही परेड सुमारे पाच तास चालते.
– अशोक सुतार