निगडीत टोळक्‍याकडून पुन्हा तोडफोड

एकावर खुनी हल्ला : महिनाभरातील तोडफोडीची तिसरी घटना

पिंपरी  – अचानक आलेल्या 28 जणांच्या टोळक्‍याने दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली. तसेच एका तरुणावर प्राणघातक हल्लाही केला. तसेच कोयते आणि तलवारी हवेत फिरवून आरडाओरडा करीत परिसरात दहशत पसरवली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली. यापूर्वीही आकुर्डी आणि ट्रान्सपोर्टनगर येथेही टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केली होती. महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याने निगडी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पप्या उर्फ टोंग्या, जित्या, शिवा आणि त्यांचे 25 साथीदार (सर्व रा. ओटास्कीम निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल रतिलाल क्षीरसागर (वय 21) यांनी याबाबत सोमवारी (दि. 16) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल रविवारी (ता. 15) रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते ओटास्कीम, निगडी येथील माता रमाई हौसिंग सोसयटीजवळ आले असता हातात कोयते, तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन हवेत फिरून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत एक टोळके आले. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ते वाहनांची तोडफोड करीत होते. त्यावेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या अमोल क्षीरसागर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये अमोल गंभीर जखमी झाले. टोळक्‍याने अमोल यांच्या देखील दुचाकीचे नुकसान केले. हा प्रकार जवळपास अर्धा तास सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ याबाबत अधिक तपास करीत आहेत. नागरिक भयभीत, पोलीस निवांत गेल्या काही दिवसांपासून निगडी परिसरातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका टोळक्‍याने आकुर्डी परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर आठच दिवसांनी रावण गॅंगच्या सदस्यांनी आकुर्डी आणि ट्रान्सपोर्ट नगर येथील वाहनांची तोडफोड करीत लुटमार केली होती.

घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करतात. मात्र अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यांनतर आता ओटास्कीम परिसरात घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर निगडी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 28 ते 30 गुंड तब्बल अर्धा तास या परिसरात धुडगूस घालत होते आणि पोलीस मात्र निवांत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.