खिळखिळ्या पीएमपीएमएल बसेसचा प्रवाशांना मनस्ताप

पुणे – पुणे महानगर परिवहन (पीएमपीएमएल) ताफ्यातील खिळखिळ्या बसेसचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध भागांत रोज सत्तरपेक्षा अधिक बसेस रस्त्यावर बंद पडत आहेत. सातत्याने या प्रकारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून पीएमपीएमएल प्रशासनाबरोबरच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) दुर्लक्ष होत आहे.

शहरात पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 100पेक्षा अधिक बसेस आयुर्मान संपलेल्या आहेत. या बसेसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण जास्त आहे. यात सर्वाधिक बसेस या भाडेतत्त्वावरील असून पीएमपीएमएल प्रशासनानेच यावर नियंत्रण नाही. यामुळे, ब्रेकडाऊन घटत नसल्याचे आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रविवारी सातारा रस्त्यावरून निगडीच्या दिशेने जाणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसचा ब्रेक जाम होऊन निकामी झाला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. ब्रेक निकामी होण्याच्या वाढत्या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

बहुतांश नादुरुस्त बस भाडेतत्त्वावरील
शहरात भाडेतत्त्वावरील बसच्या वाढत्या ब्रेकडाऊनमुळे पीएमपीएमएल प्रशासनाचे या बसेसवर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. दैनंदिन ब्रेकडाऊन होणाऱ्या बसेसमध्ये सर्वाधिक संख्या भाडेतत्त्वावरील बसेसची आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यभागात भाडेतत्त्वावरील 1 बस गणपती मंडळाच्या मंडपात घुसली होती. या प्रकारच्या सातत्याने घटना घडत असतानाही पीएमपीएमएल प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)