देवदर्शनाला चाललेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

पिंपरी – अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दगडूशेठ गणपतीच्या सकाळच्या आरतीसाठी कुटुंबासह चाललेल्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना केएसबी चौकाजवळ मंगळवारी पहाटे घडली.
प्रतिभा राकेश पाटील (वय 28, रा.जाधववाडी, चिखली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी संकष्टी चतुर्थी असल्याने पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी प्रतिभा, त्यांचे पती राकेश आणि अडीच वर्षाची मुलगी असे तिघेजण आपल्या दुचाकीवरून निघाले. पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास ते केएसबी चौक येथील पुलाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात ते तिघेही जखमी झाले. आरोपी वाहनचालकाने अपघातानंतर तिथून पळ काढला. अपघातानंतर राकेश यांचा मोबाईल अंधारात सापडत नव्हता. तो सापडल्यानंतर त्यांनी नातेवाईक व मित्रांना मदतीला बोलविले. मुलीला धनश्री हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. मात्र प्रतिभा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

घरी राहिल्याने मुलगा सुखरूप
पाटील दाम्पत्याला अडीच वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. पाटील यांच्याकडे दुचाकी आणि चारचाकी आहे. मात्र पुण्यात चारचाकी वाहन पार्क करण्यास जागा मिळत नसल्याने ते दुचाकी घेऊन निघाले होते. यामुळे त्यांनी आपल्या मुलाला घरी ठेऊन शेजाऱ्यांना लक्ष देण्यास सांगितले. मुलगा झोपेतून उठेपर्यंत आपण परत येऊ, असे पाटील दांपत्याला वाटले होते. मात्र मुलगा घरी राहिल्याने तो सुखरूप राहिल्याचे पाटील यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.