लखनौ – उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अटळ बनलेल्या लढतीत भाजप की सपची सरशी होणार याविषयी उत्सुकता बळावली आहे.
सपने २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी ३ उमेदवार दिले. तर, सत्तारूढ भाजपने ८ उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे उत्तरप्रदेशातील निवडणूक अटीतटीची बनली आहे. त्यातून दोन्ही पक्षांबरोबरच उमेदवारांचे टेन्शनही वाढणार आहे.
त्या उमेदवारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचाही समावेश आहे. त्यांना सपने उमेदवारी दिली आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. भाजपचे २५२, तर सपचे १०८ आमदार आहेत.
त्या पक्षांना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी इतर पक्षांवर विसंबून रहावे लागणार आहे. इतर पक्ष कुणाला झुकते माप देणार यावरून राज्यसभा निवडणुकीत भाजप बाजी मारणार की सप ते ठरेल. भाजपने प्रथम ७ उमेदवारच दिले होते.
त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावली होती. मात्र, गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने अतिरिक्त उमेदवार दिला. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक होणार असून ती रंगतदार ठरणार आहे.