मुंबई – छत्रपती संभाजीनगरमधून दहशतवादी कारवाईमध्ये सक्रीय असलेला संशयीत तरुण मोहम्मद जोएब खान या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाने 1 मार्चपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी (15 फेब्रुवारी) अटक करण्यात आलेला आरोपी अफगाणिस्तानातील दूतावासाच्या संपर्कात होता, अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून इसीसच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मोहम्मद जोएब खान हा महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एनआयएने छत्रपती संभाजीनगरमधील एकूण नऊ संशयितांच्या निवासस्थानावर छापे टाकले. छाप्यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्ह्य़ाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
एनआयएच्या तपासात असेही समोर आले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी जोएब खान आणि इतर संशयित हे भारतातील आणि परदेशात दहशतवादी नेटवर्कच्या कारवाया पुढे नेण्यासाठी त्यांच्या विदेशी मास्टर्सच्या सतत संपर्कात होते. हे लोक आक्षेपार्ह व्हिडिओही शेअर करत होते. 26/11 च्या हल्ल्यापूर्वी डेव्हिड हेडली मुंबईत रेकी करण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने मुंबईतील अनेक ठिकाणचे व्हिडिओही पाकिस्तानला शेअर केले होते. त्यानंतर 26/11 ला आत्मघाती हल्ला करण्यात आला होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेला आरोपी अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होता का? तो कोणाच्या संपर्कात होता? याचा तपास एनआयए करणार आहे. एनआयए त्याच्याकडून शस्त्रे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा मोबाइल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहे. या उपकरणातील डेटाचा तपास करण्यात येत आहे. आरोपीचा सोशल मीडिया डेटा ऍक्सेस करणे आवश्यक आहे. या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे.