लंडन -गेल्या वर्षीपासून यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही सातत्याने अपयशी ठरलेला भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडमध्ये नेट सरावात प्रचंड मेहनत घेत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही रोहितच्या सरावावर समाधान व्यक्त केले आहे.
रोहित ज्या पद्धतीने चेंडू मिडल करत आहे ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वर्षीपासून त्याला मी इतक्या आत्मविश्वासाने नेटमध्ये फलंदाजी करताना कधीही पाहिले नव्हते.
तो पुस्तकातील प्रत्येक फटका खेळत आहे. तसे बॅकफूट व फ्रंटफूटवरही त्याचे पाय व डोके चेंडूच्या रेषेत येत आहे. एका भरात येऊ शकत असलेल्या फलंदाजाचीच ही चिन्हे आहेत, असे द्रविड यांनी सांगितले.
कसोटी सामना खेळताना आक्रमक फटकेबाजी दुसऱ्या क्रमांकावर राहते. पहिल्या क्रमांकावर तुमचा बचाव कसा आहे हे पाहिले जाते. त्याच्यावरच आम्ही सरावात भर देत आहोत व रोहित त्यात समाधानकारक कामगिरी करत आहे.
त्याचा फॉर्म परत येण्यासाठी हाच आत्मविश्वास महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाला एक आत्मविश्वासपूर्ण खेळीची गरज आहे. अशी खेळी त्याच्याकडून झाली तर पुन्हा एकदा जुना रोहित पाहायला मिळेल, असेही द्रविड म्हणाले.
दाखल झाल्यावर लगेचच नेटमध्ये रोहित इंग्लंडला दाखल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी नेटमध्ये उपस्थित राहिला. त्याला एक क्षणही वाया घालवायचा नसल्याचेच त्याच्या या कृतीतून दिसत होते. आयपीएल स्पर्धेचा ताणही त्याच्या देहबोलीतून दिसत नव्हता. नेटमध्ये सराव करत असलेल्या सहकारी खेळाडूंशीही तो संवाद साधत असताना नेहमीप्रमाणे खेळकर वातावरण कायम राखण्याचाच प्रयत्न करत होता.
रोहितचा पहिलाच अंतिम सामना
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 ते 11 जून या कालावधीत हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीतील हा पहिलाच अंतिम सामना ठरणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेचा अंतिम सामना भारत व न्यूझीलंड यांच्यात झाला होता व त्यावेळी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते.