पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (एनएएफए) च्या वतीने २७ जूनपासून कॅलिफोर्निया येथे मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे. नॉर्थ अमेरिकेतील मराठी निर्माते अभिजीत घोलप यांनी एनएएफएची स्थापना केली आहे. त्यांच्या वतीनेच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चित्रपट महोत्सवाला अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून, त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, उमेश कुलकर्णी, निवेदिता सराफ, मृणाल कुलकर्णी, सुप्रिया पिळगांवकर, अश्विनी भावे, गीतकार गुरू ठाकूर, सुबोध भावे, प्रसाद ओक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आदी कलाकार मंडळी या चित्रपट महोत्सवास भेट देतील आणि आपले अमूलाग्र मार्गदर्शन करतील.
या महोत्सवात एनएएफए निर्मित निर्माल्य, अथांग आणि पायरव हे लघुचित्रपट दाखविले जाणार आहेत. हे लघुचित्रपट अमेरिकेतच चित्रीत करण्यात आले असून, त्यातील भूमिकाही तेथील कलाकारांनीच साकारल्या आहेत.
नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या चित्रपट महोत्सवात पाच फिचर फिल्म्सचे प्रीमिअर, दिग्गजांकडून सहा मास्टरक्लास, तीन पॅनल डिस्कशन, नऊ शॉर्ट फिल्म्सचे शो असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. २७ आणि २८ जुलैला कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे हा चित्रपट महोत्सव संपन्न होईल.