पाचगणी (प्रतिनिधी)- महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावरील गुरेघर येथील मॅप्रो गार्डन विनापरवाना सुरु असल्याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी राजीव व्होरा यांना नोटीस काढल्याने महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे .
मोजे गुरेघर येथील मॅप्रो गार्डनमुळे पर्यटकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. तसेच ही जागा इनाम वर्ग ३ देवस्थानची असल्याची देखील तक्रार जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या सर्व तक्रारींची गंभीर दखल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतली आहे.
मॅप्रो गार्डनचे मालक राजीव मयुर व्होरा यांना मॅप्रो गार्डन सुरु करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांची परवनागी, वाणिज्य कारणास्तव बिनशेती व बांधकाम परवानगी, ही मिळकत इनाम वर्ग ३ ची असल्याने शासनाची पूर्वपरवानगी, महाबळेश्वर पाचगणी प्रादेशिक योजनेत नमूद केलेल्या विहित परवानग्या इत्यादी कागदपत्रे दोन दिवसांत सादर न केल्यास आपले कोणतेही म्हणणे नाही असे समजून मिळकत सील केली जाणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी राजीव मयुर व्होरा यांच्या मालकीच्या गुरेघर येथील मॅप्रो गार्डनला दिली आहे.