नवी दिल्ली – लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनमध्ये मुस्लिम समुदायावर इतके निर्बंध लादण्यात आले आहेत की ते लोक आपले रीती रिवाज तर पाळू शकत नाहीतच मात्र आता त्यांच्या नमाज पठणावरही गंडांतर आले आहे.
चीनमध्ये 140 कोटीपेक्षा जास्त नागरिक राहतात. मात्र तेथील मुस्लिम, हिंदू आणि जैनांची संख्या फार कमी आहे. येथील बहुतांश लोक नास्तिक आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर बुध्द धर्माचे अनुयायी आहेत. चीनवर मुस्लिमांवर गेल्या काही काळापासून अत्याचार सुरू आहेत. अधून मधून त्यांच्या बातम्या येत असतात. मात्र त्याही अत्यंत त्रोटक स्वरूपात. उघ्युर मुस्लिमांना कसे अमानवीय स्थितीत जगावे लागत आहे याची मध्यंतरी वाच्यता झाली होती व त्यावरून मानवाधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि संघटना जागरूक झाल्या होत्या.
अमेरिकेने आणि काही पाश्चिमात्य राष्ट्रांनी चीनला याबाबत समज दिलीही होती. मात्र चीनने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. मात्र एवढे होत असतानाही एकाही मुस्लिम राष्ट्राने चीनकडे याबाबत अद्याप ब्र शब्द काढलेला नाही. चीनमध्ये शी जीनपिंग यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची सत्ता आहे. त्यांच्याकडून मुस्लिमांचे चीनीकरण करण्याचे काम जोरात सुरू असल्याची मानवाधिकारवाल्यांची ओरड आहे.
चीनीकरण म्हणजे चीनमध्ये राहणाऱ्या सगळ्यांनीच चीनच्या नागरिकांसारखे जगणे. त्याचा पहिला तडाखा इस्लाम धर्मियांना बसतो आहे. त्यांच्या मशिदींचे घुमट आणि मिनार हटवले जात आहेत. काही शहरांतील मशिदी पूर्णपणे पाडून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत तब्बल 16 हजार मशिदींचे रूप एकतर बदलण्यात आले आहे किंवा त्या पाडण्यात आल्या आहेत. देशातल्या प्रत्येक गोष्टीवर चीनची छाप दिसली पाहिजे. सगळ्या चीनी पध्दतीच्याच दिसल्या पाहिजेत अशी सरकारची अपेक्षा आहे. इंग्रजीत याला सिनिसायझेशन असा शब्द वापरला जातो.
पश्चिमेकडच्या राष्ट्रांच्या माध्यमांनी चीनच्या सिनिसायझेशनकडे जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मशिदी आणि मदरशांचे चीनीकरण केले जाते आहे. तुम्हाला अरब देशातील मुस्लिमांसारखे नाही तर चीनमधील नागरिकांसारखेच राहावे आणि दिसावे लागेल असे सांगितले जाते आहे. कपडे सुध्दा तुम्ही चीनच्या बाहेरील आहात असे न दिसणारे म्हणजे चीनी लोकांसारखेच घालावे लागतील असे निर्बंध आणण्यात आले आहे.
थोडक्यात मुसलमानांची चीनमध्ये राहण्या बोलण्याच्या बाबतीत किंवा दिसण्याच्या बाबतीतील स्वतंत्र ओळख मिटवण्याचाच हा प्रकार असल्याचे त्या माध्यमांनी म्हटले आहे. चीनमध्ये मुस्लिमांची संख्या साधारणत: 3 कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.