सातारा – सातारा तालुका पोलिसांनी एका गुन्ह्यात पारधी समाजातील काही संशयितांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर संतापलेल्या पारधी लोकांनी आज (सोमवार) गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या येथील घरासमोर गोंधळ घातला. पारधी समाजावर पोलीस अन्याय करतात, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, याठिकाणी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. विषारी औषध खाण्याचा प्रयत्न केलेल्या एकाला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, शंभूराज देसाई यांच्या घरासमोर गोंधळ घालणाऱ्यांना सातारा शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा तालुका पोलिसांनी पारधी समाजातील काही लोकांना एका गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले होते. त्यामुळे संतप्त पारधी लोकांनी पोलीस विनाकारण चौकशीला बोलवत असल्याचे सांगून पोलिसांकडून आमच्यावर वारंवार अन्याय होत असल्याचा आरोप करत देसाई यांच्या सातारा शहरातील पोवई नाका येथील “कोयना दौलत’ या निवासस्थानासमोर ठिय्या दिला. देसाई यांना भेटल्याशिवाय जाणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
मात्र, सध्या अधिवेशन सुरू असल्याने देसाई मुंबईत असल्याने भेटता येणार नसल्याचे उपस्थित पोलिसांनी सांगताच संतप्त पारधी लोकांनी घराबहोरच आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक गोंधळ घालत राडा केला. त्यामुळे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. त्याठिकाणी असलेल्या पारधी लोकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी एका पारधी व्यक्तीने त्याच्याकडील विषारी औषध खाल्ल्याचा
प्रकार उपस्थित पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला उपचरासाठी तातडीने जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे पोवई नाका परिसरातील आणि शहरातील नागरिकांची मंत्री देसाईंच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडीतून वाहनांना वाट करून परिसर मोकळा केला. यावेळी संबंधित लोक “पारधी समाजावर पोलीस अन्याय करतात’, असा आरोप करून गोंधळ घालत असल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्रीपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.