पुणे – परदेश प्रवास करून पुण्यात आलेल्या प्रवाशांना करोनाची लक्षणे आढलेली नाहीत. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना पुढील 14 दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरातच विलगीकरण (होम क्वारंटाइन)च्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु काही व्यक्ती त्याची काटेकोर अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून आले. त्याबाबत तक्रारी आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन व्यक्ती त्याच्या घरी असल्याची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने पुणे पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
पुणे शहरात विलगीकरण कक्षाची शिफारस केलेल्या 1 हजार 276 व्यक्तींची पडताळणी करण्यासाठी 152 पोलीस पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी असून त्यांना आवश्यक सुविधा (ग्लोव्हज, मास्क व सॅनिटायझर ) उपलब्ध करून देण्यात आल्या. दि.22 मार्च रोजी सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन क्वारंटाइन व्यक्ती घरात आहे की नाही याची केली. दुसऱ्या टप्प्यात घरी असलेल्या 821 व्यक्तींचा दररोजचा संपर्क टाळण्यासाठी त्यांना पोलिसांनी व्हिडीओ कॉल करुन त्यांचे घरातील विशिष्ट जागेवर उभे राहून उत्तर द्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच खातरजमा करण्यासाठी शेजारी कुटुंबाची निगराणीसाठी मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे घरी जावे लागणार नसल्याने प्रत्यक्ष संपर्कातून संसर्ग टाळणे सहज शक्य होणार आहे.
व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संशयितांच्या मागावर राहण्यासाठी होणारे श्रम व वेळ यांत बचत व्हावी, त्यापेक्षाही पोलीस कर्मचाऱ्यांना संसर्गाची मुळीच शक्यता राहू नये, यासाठी कोटा व्हिजन लॅब, बेंगलोर यांच्या मदतीने संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडील संकलित केलेली माहितीनुसार सर्व संबंधितांना नमूद वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यासाठी एसएमएस करण्यात आले आहेत. या प्रणालीनुसार संशयिताला विशिष्ट ठिकाणी उभे राहून घड्याळासमोर सेल्फी फोटो ऍपवर अपलोड करावा लागणार आहे.
क्वारंटाइन व्यक्तीने दिवसात सकाळी 8 वाजेपासून रात्री 10वाजेपर्यंत किमान 2 वेळा आपला फोटो अपलोड करावा लागणार आहे.