दिघी, (वार्ताहर) – भोसरीतील आळंदी रस्त्यावर सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. बनाचा ओढा ते भोसरी-आळंदी रस्ता चौकापर्यंत सुमारे एक किलोमीटरसाठी साधारण अर्धा तास वेळ लागतो. तर दिघी भोसरी रस्त्यावरही वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी हातगाडीवाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहनेही लावली जातात. पादचारीही रस्त्यावर असल्याने वाहनांची कोंडी होते. त्यामुळे भोसरीकरांना या रस्त्याने प्रवास करणे नकोसे वाटत आहे.
या मार्गावर सम-विषम पार्किंगचे नियोजन आहे. मात्र, या ठिकाणी दररोज रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात. रस्त्याच्या कडेला हातगाडीवाले आणि पथारीवाले ठाण मांडून बसलेले असतात. आळंदी रस्त्यावर भोसरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी येणार्या ग्राहकांची संख्या मोठी आहे.
येथील पदपथही अरुंद असून, काही ठिकाणी दुकानदारांनी विक्रीच्या वस्तू पदपथावर ठेवल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आणि नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. परंतु याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक नियंत्रक पोलीस दुर्लक्ष करत असल्याने भोसरीकर वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत.
वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका
भोसरी-आळंदी रस्ता चौकात आळंदी रस्त्याने वळणार्या वाहनांची कोंडी या चौकात झालेली असते. त्यामुळे या सेवा रस्त्यावर कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौक ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
बेशिस्त वाहनचालकांमुळे व अनधिकृत पार्किंगमुळे भोसरीत वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस सतत अपयशी ठरत आहे. वाहतूक पोलीस कायमचे केवळ बघ्यांच्या भूमिकेत उभे असतात.
अतिक्रमणांवर कारवाईची गरज
आळंदी रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियम मोडणार्यांवर वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला असणार्या हातगाडी, पथारीवाल्यांना हटविणे पादचार्यांसाठी पदपथ मोकळा करणे भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक येथे सायंकाळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक व चांदणी चौकात पार्किंग करणार्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.