वडगाव मावळ, (वार्ताहर) – अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे मोठ मोठ्या होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्याच्या घटना ताज्या असताना व वडगाव परिसरात देखील मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दोन – तीन होर्डिंग पडून दुर्घटना घडल्या असताना देखील वडगाव नगरपंचायत प्रशासन केवळ अनाधिकृत होर्डिंग मालकांना नोटिसा बजावून गप्प बसले आहे. शहरात २५ अनधिकृत होर्डिंग असून राजकीय दबावामुळे नगरपंचायत प्रशासन अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीत एकूण २५ अनाधिकृत होर्डिंग्ज असून यामध्ये एमआयडीसी रोड लगत ९, वडगाव उर्से रोड लगत ४ व मुंबई – पुणे महामार्गालगत १२ होर्डिंग आहेत. मागील वर्षी देखील साधारणतः एवढ्याच अनाधिकृत होर्डिंग्ज वडगाव नगर पंचायत हद्दीत होत्या. मात्र, वडगाव नगरपंचायत प्रशासन मागील वर्षीपासून केवळ अनाधिकृत होर्डिंग्जला नोटीस देऊन गप्प बसले आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई मागील वर्षी पासून करण्यात आलेली नाही.
प्रत्येक वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाबरोबर जोरदार वादळी वारे येते. त्यात अनेक दुर्घटना घडतात. वादळी वाऱयामध्ये अनेकांच्या घरांची, दुकानांची, गोठ्याची पत्रे उडून जातात. तसेच रस्त्यच्या कडेला व शहरात उभारलेल्या होर्डिंगचा वादळी वाऱयात निभाव लागत नाही, आणि ते कोसळतात. या घटनेत अनेक निष्पाप जीवांना आपली जीव गमवावा लागतो. या वेळी नेमके कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न पडतो.
मागील वर्षी देखील होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर वडगाव नगरपंचायतीस जाग आली होती. तेंव्हा देखील मुख्याधिकारी यांनी अनाधिकृत होर्डिंगची माहिती घेऊन त्यांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या व होर्डिंग्ज मालकांना होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास सांगितले होते. मात्र, सदर घटनेचा विसर पडल्यानंतर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे अनाधिकृत होर्डिंग तसेच कायम राहिले आहेत.
होर्डिंग मालकांबरोबर प्रशासन जबाबदार
मावळात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे एमआयडीसी रोड लगतच्या दोन होर्डिंग पडले. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, अनाधिकृत होर्डिंग असताना देखील त्याकडे काना डोळा करणाऱ्या प्रशासनास देखील यापुढे होर्डिंग मालकांबरोबर जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
येथे आहेत अनधिकृत होर्डिंग
– एमआयडीसी रोड लगत ९
– वडगाव उर्से रोड लगत ४
– मुंबई – पुणे महामार्गालगत १२
एकूण २५
वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व अनाधिकृत होर्डिंग मालकांना नोटिसा बजावल्या असून गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ज्या होर्डिंग पडल्या आहेत, त्यांच्या मालकांवर सोमवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. – प्रवीण निकम, मुख्याधिकारी.