पुणे, दि. 1 -“गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शहरातील विविध ठिकाणी गुरुवारी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
बुधवारी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवस गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात येते. दीड दिवस मनोभावे श्रींची पूजा केल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून पालिकेने उभारलेल्या हौदात आणि विसर्जन घाटावर जावून गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष नागरिकांनी घरातच किंवा पालिकेच्या फिरत्या हौदात गणेश मूर्तींचे विसर्जन केले होते; पण यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने नागरिकांनी वाजत गाजत गणरायाला निरोप दिला. विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने विसर्जन घाटांवर कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गौरसोय झाली. शहरातील नदीलगत असलेल्या विसर्जन घाटांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.