पुणे -सराईत वाहन चोरास खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर, यापूर्वी या गुन्हेगारावर खडक, विश्रामबाग, दत्तवाडी, कोथरूड, लष्कर आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी आणि वाहन चोरीचे तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.
अभिषेक ऊर्फ पप्पू पवार (वय 33, रा. गुरूवार पेठ) असे चोरट्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार समीर माळवदकर व फहिम सय्यद यांना माहिती मिळाली की, पवार याने शुक्रवार पेठ येथून गाडी चोरी केली असून, तो घोरपडे पेठ येथे थांबला आहे.
त्यानुसार त्याला अटक केली. त्याच्याकडून स्वारगेट कॅनॉलशेजारी ठेवलेल्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या. तपास पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सह प्रभारी उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार फहिम सय्यद, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, हिंमत होळकर, अजिज बेग, सागर केकाणे, अमेय रसाळ, अनिकेत बाबर यांनी ही कारवाई केली.