पुणे – भटक्या श्वानांना खायला देणाऱ्या श्वानप्रेमी महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना चंदननगर भागात घडली. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत श्वानप्रेमी महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी महिला बहीणी आहेत. श्वानप्रेमी महिला आणि आरोपी महिला एकाच परिसरात राहायला आहेत. श्वानप्रेमी महिलेने तिच्या घरी श्वान पाळले आहेत.
रस्त्यावरच भटक्या श्वानांना त्या खाऊ घालतात. श्वानांना रस्त्यात खायला दिल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होते, असा आरोप करून दोन महिलांनी श्वानप्रेमी महिलेला मारहाण केली. त्यांना शिवीगाळ केली. तक्रारदार महिलेवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. शनिवारी (८ जानेवारी) तिने पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी महिलांनी श्वानप्रेमी महिलेविरोधात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करत आहेत.