निकोसिया – डेल्टा आणि ओमायक्रॉन या करोनाच्या दोन विषाणूच्या संयुगातून एक नवीन उच्परिवर्तित विषाणू विकासित झाला आहे. त्याला “डेल्टाक्रॉन’असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. हा नवीन उत्परिवर्तित विषाणू सायप्रसमध्ये सापडला आहे. मात्र या विषाणूबद्दल काळजी करण्यासारखे नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे.
सायप्रसमध्ये नव्याने तपासणीसाठी घेण्यात आलेल्या 25 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे 10 उत्परिवर्तित अंश आढळले आहेत. या 25 जणांमध्ये करोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 11 जणांच्या नमुन्यांचा समावेश आहे. तर उर्वरित 14 नमुने सर्वसामान्य नागरिकांमधून गोळा करण्यात आलेले आहेत.
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये उत्परिवतर्नाचे प्रमाण अधिक आहे, असे सायप्रस युनिव्हर्सिटीतील लॅबोरेटरी ऑफ बायोटेक्नोलॉजी ऍन्ड मॉलेक्युलर व्हायरोलॉजीचे प्रमुख डॉ. लिओन्डिओस कोस्ट्रिकिस यांनी सांगितले. या नवीन उत्परिवर्तित विषाणूचे गुणधर्म डेल्टाशी अधिक प्रमाणात आणि काही अंशी ओमायक्रॉनशीही साधर्म्य दाखवणारे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मात्र या नवीन उत्परिवर्तित विषाणूचा आता फारसा धोका नसल्याचे सायप्रसचे आरोग्य मंत्री मिशालीस हादजीपॅन्डेलास यांनी सांगितले.