पुणे – नगररस्त्यावर बीआरटी मार्गातून भरधाव निघालेला दुचाकीस्वार पीएमपी बसवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकासह सहप्रवाशाचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार विजयकुमार प्रजापती (वय 24, रा. वाघोली), सहप्रवासी धनराज नारायण चौधरी (वय 21, रा. शाहूनगर, चिंचवड) यांचा मृत्यू झाला.
याबाबत पीएमपी चालक बाळू बेळगे (वय 43, रा. चंदननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीस्वार प्रजापती आणि सहप्रवासी चौधरी नगररस्त्यावरील इनऑर्बिट मॉलजवळ असलेल्या सिग्नलजवळून बीआरटी मार्गातून भरधाव निघाले होते. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास पाहिल्यानंतर पीएमपी चालक बेळगे यांनी बस थांबविली. प्रजापती आणि चौधरी बसवर आदळले. यात प्रजापती याचा जागीच मृत्यू झाला. सहप्रवासी चौधरी गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान चौधरीचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करत आहेत.