जातपात हा समाजाचे विघटन करणारा जुना रोग
फलटण, दि. 29 – समाजाचे विघटन करणारा जातपात हा एक सामाजिक जुना रोग आहे. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी तरुणांनी संघटित होऊन एक दिलाने कार्य केले पाहिजे, अशा तऱ्हेचे उद्गार चिमणराव कदम यांनी काढले. ते पुढे म्हणाले, निवडणुकीत जातीकुळाचा आश्रय घेऊन निवडून येणे लोकशाहीला मारक गोष्ट आहे. निवडणुकीत या जाती जमातीच्या नावाचा अगदी वीट आला आहे.
देश समर्थ बनविण्याचे कामी विरोधकांचाच अडथळा!
अहमदाबाद – आज येथे जाहीर सभेत भाषण करताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षीयांवर जोरदार ताशेरे झाडले. विशेषतः जन संघावर खूप आग पाखडली. त्या म्हणाल्या, भारताने समर्थ बनू नये, प्रगतीपथावरील वाटचाल रोखावी असा विरोधकांचा उद्देश आहे.
सोव्हियत युनियनकडून विकसनशील देशांची लुटमार
टोकियो – सोव्हियत युनियन आर्थिक मदत देऊन मदत दिलेल्या देशांचा गैरफायदा घेत आहे, अशी टीका चीनने आज येथे केली. सोव्हियत युनियनने दिलेल्या आर्थिक मदतीवर भारतात 80 टक्के मशीन बिल्डिंग कारखानदारी,
60 टक्के विजेची साधने, 35 टक्के तेल गाळण्याची साधने व 38 टक्के पोलाद कारखाने असून सोव्हियत युनियनने आर्थिक मदतीच्या नावाखाली ही आर्थिक लुटमार सुरू केली आहे. सोव्हियत युनियन सध्या 40 विकसनशील देशांना 5000 दशलक्ष रुबल्सची आर्थिक मदत देत आहे.
साध्या कोयत्याने सिंहाचे डोके उडविले
जोहान्सबर्ग – झाबेंजी खोऱ्यातील खेड्यात एका झोपडीत एका सिंहाने आपले डोके खुपसले त्यावेळी एका खेडुताच्या बायकोने त्या सिंहाचे डोके साध्या धारदार कोयत्याने उडविले अशी बातमी आहे.