पिंपरी, {संगीता कांबळे} – पिंपरी चिंचवड शहरात आता डोळे स्कॅन करून रेशन मिळणार असून या सुविधेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील १५७ स्वस्त धान्य दुकानदारांना अद्ययावत केलेल्या मशिनचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता बोटांच्या ठशांऐवजी डोळ्यांचे स्कॅनिंग करून शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे सुलभ होणार आहे.
मात्र, त्यातही त्रुटी आढळून येत असून ज्यांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत, अशा अनेक ज्येष्ठांच्या डोळ्यांची विविध कारणांनी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे डोळेही स्कॅन होईनात. त्यामुळे या यंत्रनेतही अडचणी येत असून पुन्हा शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागणार का? असा प्रश्न आहे.
शहरातील सर्वच रास्तभाव दुकानात ई-पॉस यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. धान्य मिळण्यापूर्वी बोटांचे ठसे उमटले जात नसल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यांना आता स्कॅनरची (डोळ्यांचे स्कॅन) देखील सुविधा दिली आहे.
या सुविधेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील १५७ स्वस्त धान्य दुकानदारांना अद्ययावत केलेल्या मशिनचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, त्या मशिनमध्येही काही त्रुटी येत आहेत. ज्येष्ठ नागरिक किंवा काही कष्टाची कामे करणाऱयांच्या बोटांचे ठसे पुसट होतात. यांच्यासाठी हे मशिन आहे.
मात्र, ज्यांचे डोळे चांगले आहेत, त्यांच्यासाठीच या मशिनचा वापर करता येत आहे. काही कारणांनी ज्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे, अशांसाठी हे मशीन उपयुक्त नाही. कारण त्यांच्या डोळ्यांचे स्कॅन होत नाही. त्यामुळे त्रुटी दूर करूनच यंत्रणा राबविणे गरजेचे आहे.
धान्य वाटपात पारदर्शीपणा यावा यासाठी ई-पॉस मशिनची सुविधा देण्यात आली आहे. या मशिनद्वारे कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळते व त्यानुसार धान्य वाटप केले जात होते. त्यासाठी अंगठ्याचे ठसे घेतले जात होते. मात्र, अनेक वेळा अंगठ्यांचे ठसेच न उमटल्याने धान्य मिळत नाही. त्यावर उपाय म्हणून आय स्कॅनरची सुविधा दिली आहे.
यामध्ये अंगठ्यांचे ठसे घेण्याबरोबरच डोळ्यांचे देखील स्कॅन केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात अ व ज शिधापत्रिका कार्यालयाचा समावेश होतो. यामध्ये अ शिधापत्रिका कार्यालयांतर्गत ८२ तर ज शिधापत्रिका कार्यालयांतर्गत ७५ धान्य दुकानदारांचा समावेश होतो.
ठसे उमटेनात, डोळे स्कॅन होईनात
ज्या व्यक्तींचे वय ६० पेक्षा अधिक आहे, अशांच्या हाताचे अनेकदा ठसे उमटत नाहीत. तसेच कष्टाचे काम करणाऱ्यांच्या बोटाचेही ठसे उमटत नाहीत. त्यामुळे आय स्कॅन ही सुविधा उपयुक्त आहे. मात्र, काही कारणांनी ज्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे,
त्यच्या डोळ्यांचे स्कॅन होत नाही. परिणामी त्यांना पुन्हा धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे त्रुटी दूर करूनच उपाययोजना राबविण्याची गरज आहे, असे शिधापत्रिका धारकांचे म्हणणे आहे.
ई-पॉस मशिनमध्ये अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. ठसे न उमटलेल्यांना धान्य न मिळाल्याने तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून आय स्कॅनरची सुविधा व मशिन १ मे पासून दिली आहे. मात्र, अनेक ज्येष्ठांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे.
त्यामुळे त्यांचे डोळे स्कॅन होत नाही. त्यामुळे या योजनेतही त्रुटी येत आहेत. परिणामी ज्यांच्यासाठी ही योजना आहे, ते पुन्हा धान्यापासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे योजना राबविताना सरकारने सर्व गोष्टींचा विचार करून राबविणे गरेजेच आहे. – विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशन.