पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी नऊ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. दरम्यान, देशभर गाजत असलेल्या निवडणूक रोखे प्रकरणात नाव पुढे आलेल्या मेघा इंजिनिअरिंग अॅंड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नवयुग इंजिनिअरिंग कंपनी या कंपन्यासुद्धा रिंगरोडसाठी पात्र ठरल्या आहेत.
“एमएसआरडीसी’ने पूर्व व पश्चिम अशा दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याची एकूण लांबी १२७ किमी असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. दोन टप्प्यांत हे काम होणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे भूसंपादन जवळपास ऐंशी टक्के झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आले आहेत. तर पूर्व रिंगरोड मार्गिकेचे देखील भूसंपादन गतीने सुरू आहेत.
दोन्ही टप्प्यांतील मिळून रिंगरोडचे आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले आहे. या रिंगरोडचे कामाचे नऊ टप्पे करून काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाकडून राबविण्यात आली. निविदा भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिलपर्यंत होती. ही मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. मुदतीत १२ कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या.
दरम्यान, मंगळवारी मुंबई येथे दाखल निविदा उघडण्यात आल्या. त्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग, नवयुग इंजिनिअरींग या दोन्ही कंपन्या नऊ पॅकेजपैकीत प्रत्येकी तीन असे सहा पॅकेजमध्ये सर्वांत कमी रक्कमेच्या निविदा भरल्या म्हणून त्या पात्र ठरल्या आहेत.
तर उर्वरित तीन पॅकेजमध्ये पीएमसी इन्फ्रा, रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा आणि जीआर इन्फ्रा या कंपन्या प्रत्येक एक पॅकेजमध्ये सर्वात कमी किमतीच्या निविदा भरल्या म्हणून पात्र ठरल्या आहेत, असे महामंडळकडून सांगण्यात आले.
छाननी होताच वर्कआॅर्डर
पात्र ठरलेल्या कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांची छाननी करण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगरोड मार्गी लावण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. छाननीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामासाठीची वॅर्कऑर्डर संबंधित कंपन्यांना दिली जाणार आहे, त्यामुळे जूनमध्ये रिंगरोडच्या कामाला सुरू होण्याची शक्यता आहे.