पिंपरी, (प्रतिनिधी) – महिनाभरापूर्वी वाकड पोलिसांनी एका गुंडाला तडीपार केले होते. त्या गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे करण्यात आली.
राजेंद्र उर्फ राजा काशिनाथ वाडघरे (वय 35, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विक्रांत चव्हाण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2 एप्रिल 2024 रोजी 12 महिन्यांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
त्याचा तडीपारीचा कालावधी संपला नसताना देखील त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.