पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही.
तसेच, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात २५ टक्के मालमत्ता धारकांनी २०० काेटी रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा सहा लाख 28 हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे. मालमत्ताधारकांना बिल मिळताच कर भरण्यास ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच अवघ्या दीड महिन्यात १ लाख ८१ हजार ९६८ मालमत्ता धारकांनी तब्बल २०० काेटी ३९ लाख रूपयांचा कर भरणा केला आहे.
‘कर सवलत योजना’
आगाऊ मालमत्ता कर ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास ३० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मालमत्तेस ५० टक्के, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास ५० टक्के, ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्यांना ३० जूनपर्यंत ५ टक्के, जुलै ते सप्टेंबरअखेर पर्यंत भरणा करणाऱ्या ४ टक्के, स्वयंफूर्तीने माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत मालमत्तांची नोंदणी केल्यास ५ टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के,
संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात १०० टक्के, चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात ५ टक्के, कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना ५ पासून १० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन बिल्डिंग रेटींग तीन ते पाच रेटींगपर्यंत ५ पासून १५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
असा आला कर
आँनलाइन – १३२ कोटी ९२ लाख
रोख – १२ कोटी १४ लाख ६४ हजार
धऩादेश – ८ कोटी ६ लाख ५१ हजार
आरटीजीएस – १ कोटी २२ लाख ४४ हजार
डीडी – ४९ लाख ३० हजार
एनएफटी – ४ कोटी ३९ लाख २० हजार
विविध अँप- ४ कोटी ९२ लाख ५२ हजार
पर्यावरण पूरक सोसायटी सवलत
सवलतीचे नाव सवलत घेतल्यांची संख्या भरणा रक्कम सवलत रक्कम
ऑनसाइट कंपोस्टींग – १८०३ १३६८१७४७ ४५६६४७
ऑनलाइट कंपाेस्टींग, एसटीपी – ३२५८ ३६८२४७६७ २०७४४३८
एसटीपी – १०३४ १३२२५४४३ २२७५३२
झिरो वेस्ट – १ ५२४६ ३०२
झिरो वेस्ट, एसटीपी – ३९७ ४१९२०९६ ३०८४१२
एकूण – ६४९३ ६७९२९२९९ ३०६७३३१
चालू आर्थिक वर्षात २५ टक्के मालमत्ता धारकांनी तब्बल २०० कोटी रूपयांचा कर भरणा केला आहे. तसेच, मालमत्ता धारकांनी ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींचा मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक