वाघोली – लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वाहन चालक कर्मचारी बापूसाहेब वसंतराव जाधव (सध्या नेमणूक मोटर परिवहन विभाग, पुणे शहर) यांनी केलेल्या गैरवर्तणुकीमुळे त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जाधव यांच्या निलंबनाचे आदेश रोहिदास पवार (पोलीस उप आयुक्त, मुख्यालय पुणे शहर ) यांनी दि. २७ रोजी काढला आहे.
याबाबतीत वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील तुकाराम शंकर ढवळे यांनी (दि. २१ जून ) लोणीकंद पो. स्टे. पुणे शहर येथे तक्रार अर्ज सादर केला होता. यानुसार जाधव यांनी ढवळे यांच्या पत्नीस फूस लावून वेगळे राहण्यासाठी मदत केली आहे. यामुळे ढवळे यांचा संसार मोडला असून त्यांच्या मुलींचे देखील नुकसान झाले.
जाधव यांचे हे वर्तन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे शिस्तीस बाधा आणणारे व शासकीय सेवकास अशोभनीय असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जाधव यांना, मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ ) (एक) (ब) च्या तरतुदीनुसार व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांनी मला न्याय मिळवून दिला आहे.
– तुकाराम ढवळे तक्रारदार, वाडेबोल्हाई