काही देशांत करोना संसर्ग पसरत असल्याने सतर्कता
पुणे – राज्यात करोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, काही देशात आत करोनाच्या चौथ्या लाटेल सुरवात झाली असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे खबरदारी म्हणून तापसदृश आजार आणि तीव्र श्वसन विकारांच्या आजारांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या सूचना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आशिया आणि युरोप खंडात संसर्गितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले. तापसदृश आजारांची आणि तीव्र श्वसन अडथळ्याचा संसर्ग चाचणी हे सरकारसाठी करोना नियंत्रणाचे मुख्य स्तंभ आहेत.
आता सजगता वाढवून ताप आणि श्वसनविकाराच्या रुग्णांची करोना चाचणी करून त्यातील पॉझिटिव्ह अहवाल जनुकीय संरचनेच्या तपासणीसाठी पाठवावेत, असे या आदेशात म्हटले आहे.
पुन्हा आढावा बैठका
करोनाची तिसऱ्या तिसऱ्या लाटेत बाधित संख्येने उच्चांक गाठला. मात्र, लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्युची संख्या खूप कमी झाली. आता करोनाची तिसरी लाट ओसरली असून, दैनंदिन बाधित संख्या दोन आकडी झाली. निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे दर आठवड्याला उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितील होणारी करोना आढावा बैठकही घेतली नाही.
शेवटची बैठक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाली. एक महिना उसंत नाही मिळत तेच आशिया आणि युरोप खंडातील चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बैठका सुरू झाल्या आहेत.