कात्रज -पावसाळीपूर्व ओढे-नाले, कलव्हर्ट, पावसाळी लाइन व ड्रेनेज लाइन चेंबर सफाईची कामे जवळपास 75 टक्के पूर्ण झाली आहेत. दोन ठिकाणी मशीन उतरवू शकत नसल्याने मनुष्यबळ साहाय्याने सफाईच्या सूचना दिल्या आहेत, असे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांनी सांगितले.
पालिका प्रशासनाच्या वतीने पावसाळीपूर्व अंतर्गत ओढे-नाले व कलव्हर्टची सुरू असलेली सफाईची कामे अंतिम टप्यात आली आहेत. लेकटाऊन, कात्रज तलाव, शेलारमळा, सुखसागरनगर, आनंदनगर या भागातील ओढे-नाले कलव्हर्टच्या कामांची पाहणी डॉ. ज्योती धोत्रे यांनी केली. यावेळी त्यांनी सदर अधिकारी व ठेकेदार यांना सूचना केल्या.
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयंतर्गत 17 कि.मी. अंतराचे लहान मोठे ओढे-नाले असून 14 मुख्य कलव्हर्ट आहेत. गेल्या एक महिन्यांपासून सफाई कामे सुरू असून अंतिम टप्यात आली आहेत, असे उपअभियंता ज्योती वेदपाठक यांनी सांगितले. यावेळी कनिष्ठ अभियंता सानीका ढोले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विकास मोरे उपस्थित होते.