कोंढवा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि माजी आमदार माहादेव बाबर यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच, अशी खूणगाठ बांधल्यानंतर बाबर यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
माझे मार्गदर्शक, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा माजी आमदार महादेव बाबर यांची भेट झाली. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक असते. महाविकास आघाडी म्हणून सोबत प्रत्यक्ष काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी दिलेल्या आवाहनानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला (शिंदे गट) सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिरूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आग्रही आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी माजी आमदार बाबर यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
औपचारीक गप्पा
हडपसर हा मतदार संघ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा असल्या कारणाने ते नेहमीच या भागास भेट देत असतात. आमच्या भेटीत विशेष काही राजकीय चर्चा झाली नाही. त्या नेहमीच प्रमाणे चाय पे गप्पा होत्या. लोकसभेसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे, आमचा त्यांना नेहमीच पाठींबा असणार आहे. पक्ष प्रमुखांकडून जो कोणी उमेदवार दिला जाइल त्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करू, असे माजी आमदार महादेव बाबर यांनी याभेटीच्या दरम्यान स्पष्ट केले.