पारगावचा तरुण शेतकरी महिन्याला घेतोय एक ते दोन लाखांचे उत्पन्न
पारगाव : दौंड तालुक्यातील पारगाव येथील तरुण पदवीधर शेतकरी ईश्वर नवनाथ ताकवणेने 60 गुंठे जमिनीत सहा वेगवेगळ्या प्रकारच्या तरकारी करून महिन्याला कमीत कमी एक लाख ते दोन लाखापेक्षा जास्त रुपये कमवितो आहे.
ईश्वर ताकवणेची वडिलोपार्जित एकूण पाच एकर जमीन आहे. सध्या पारंपरिक शेती करून कोणतेच ध्येय साध्य होणार नसल्याचे ईश्वरने जाणले व सहा वर्षांपासून काही क्षेत्रात तरकारी पिके घेऊ लागला. त्यामध्ये आधुनिक प्रकारचे बियाणे, औषधे, खते यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे वापर करीत भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित केले व महिन्याला लाख रुपयांच्या घरात पैसे कमावू लागला. आसपासच्या आठवडे बाजारी तरकारी विक्रीसाठी ईश्वरने छोटा टेम्पो सुद्धा घेतला आहे.
आठवड्यातून एखादा दिवस वगळता रोज तरकारी तोडावी लागत आहे. त्यामुळे बाजारच्या चढ उताराने दिवसाला कमीत कमी चार हजार ते जास्तीत जास्त 20 हजारपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे ईश्वरने सांगितले. तरकारी पिकांसाठी रासायनिक खतांचा अत्यंत कमी म्हणजे फक्त 25 टक्के वापर करून शेणखत, जीवामृत, गो कृपामृत याचा वापर केला जात असल्याचे ईश्वरने सांगितले.
किशोरचे वडील नवनाथ ताकवणे यांनी सुद्धा या पूर्वी कांद्याचे एकरी 500 पिशव्यांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या कामी ईश्वरची पत्नी सारिका, आई सुवर्णा, वडील नवनाथ व आजी गोदाबाई हे मदत करीत असतात. तसेच बंधू किशोर यांचे ही मार्गदर्शन लाभते. या व्यतिरिक्त दोन महिला कामगार असून वडील नवनाथ ताकवणे हे टेम्पो घेऊन आसपासच्या गावी आठवडे बाजारात ही तरकारी नेऊन विकण्याचे काम करतात. एकंदरीत तुटपुंज्या पगारासाठी शहरात जाणार्या तरुणांसाठी किशोर हा एक आदर्श ठरला आहे.
प्रत्येक पीक 10 गुंठ्यात
सध्या 60 गुंठे जमिनीत हिरवी मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, कारले, काकडी, दोडका या पिकांची प्रत्येकी 10 गुंठे लागवड केली आहे. इतर जमिनीत ऊस हे पीक आहे. ऊस पिकात अंतर पीक म्हणून कोबी हे पीक घेतले आहे.
तरुणांनी 15 ते 20 हजारांच्या नोकरीसाठी शहराची वाट न धरता. पाच ते सहा प्रकारचा भाजीपाला लावून अगदी लहान मुलांचा सांभाळ केला जातो तशी प्रामाणिकपणे व काळ्या आईची सेवा केली तर एक एकर जमिनीत एक कुटुंब अगदी चांगल्या प्रकारे आपले जीवन व्यथित करू शकते हे मात्र नक्की.
– ईश्वर ताकवणे, पारगाव, शेतकरी