तीन माजी शिक्षणप्रमुखांना पालिकेची नोटीस : जादा वेतनही दिले
पुणे – महापालिका शिक्षण मंडळाच्या तत्कालीन शिक्षणप्रमुखांनी चुकीच्या पद्धतीने पदोन्नती देऊन तसेच चुकीच्या ग्रेड पेद्वारे अनेक कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन दिल्याचा घोटाळा समोर आला आहे.
याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने या पदोन्नती आणि अनियमित पद्धतीने सेवेत कायम केल्यावरून शिक्षण विभागप्रमुख मीनाक्षी राऊत यांच्याह माजी शिक्षणप्रमुख सुधाकर तांबे आणि रामचंद्र जाधव यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच या तिघांसह जादा वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे. अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी या नोटीस बजावल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन शिक्षण प्रमुखांकडून सेवाभरती, पदोन्नती आणि सेवालाभ देत असताना नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार या नोटीस बाजाविण्यात आल्या आहेत. तसेच सात दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या शिक्षण प्रमुखांसह या उमेदवारांनाही पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. त्यांना देण्यात आलेले जादा वेतनही वसूल केले जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणी गुंतलेले आहे का, याचा तपास प्रशासन करत आहे.
असे आहेत भरती घोटाळ्यातील प्रकरणे
दोन पदोन्नती झाल्या नसताना तिसऱ्या वेतनाची पदोन्नती देणे
वरिष्ठ लेखनिक पदावरून सर लेखनिकपदी पदोन्नती दिली आहे
त्यांची सेवा तीन वर्षे पूर्ण झाली नसतानाही नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली आहे
पाच उमेदवारांनी नोकरीमध्ये भरती होत असताना एमएस-सीआयटी परीक्षा दिली नसतानाही सेवेत घेतले आहे
हंगामी उमेदवारांनाही कायम करणे
भांडारपाल पदावरून वरिष्ठ अधीक्षक पदावर पदोन्नती
6 महिन्यांसाठी घेतलेल्या लेखनिकांना सेवेत कायम करणे
पदे मान्य नसताना अनेक पदांची पदभरती करणे