पुणे – आता छुपी पाणी कपात; नियोजन पुरते कोलमडले

पुणे – शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून 10 ते 15 टक्के छुपी पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे टेल एन्डपर्यंत (जलवाहिनीच्या शेवटचा भाग) पाणीच पोहोचत नसून उपनगरांत पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक तसेच लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले असून अधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे ते मोबाइलही बंद ठेवत आहेत.

पाणीसाठ्याचे नियोजन करताना, शहरात एकवेळ पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने दररोज 1,350 एमएलडी पाणी निश्‍चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात उन्हाळ्यात शहरातील पाण्याची मागणी 10 ते 15 टक्के वाढली. त्यामुळे एकवेळ आणि किमात दोन तास पाणी द्यायचे असल्यास सुमारे 1,480 एमएलडी पाण्याची दररोज गरज आहे. त्यामुळे पालिकेने दररोज प्रत्यक्ष गरजेइतके पाणी घेतल्यास धरणातील साठा 15 जुलैपर्यंत पुरणार नाही. त्यामुळे उर्वरित 130 एमएलडी पाण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अघोषितपणे वेळापत्रकात जाहीर करण्यात आलेल्या पाण्याच्या वेळेला 1 ते दीड तासांची कात्री लावण्यात आली आहे.

शेवटच्या टोकाला फटका
हडपसर, महमंदवाडी, कोंढवा, धायरीचा काही भाग, विमाननगर, लोहगाव, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, विश्रांतवाडी, कळस, धानोरी या भागातील नागरीकांना अतिशय कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणी मिळत असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या नागरिकांची ओरड वाढल्यानंतर शहरातील इतर भागात पाणी कमी करून या भागाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात 10 ते 15 टक्के कपात वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

पाणी खेचण्याचे प्रकार वाढले
पाणी कमी दाबाने तसेच कमी वेळाने येत असल्याने घरात मोटारी लावून पाणी खेचण्याचे प्रकार वाढले असल्याने वितरणात अडचणी येत असल्याचेही अधिकारीसांगत आहेत. अशा मोटारी शोधण्यासाठी पथके नेमण्यात आली असली, तरी प्रत्येक घरात जाऊन तपासणी करणे शक्‍य नसल्याने कारवाई करण्यात अडचणी येत असल्याची कबुली अधिकारीच देत आहेत. त्यामुळेही अनेक भागांत कमी दाबाने पाणी जात असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.