कोथरूड (सागर येवले) –“पक्षाने दिली संधी तर आहे त्या पक्षात थांबून निवडणूक लढवू, अन्यथा ज्या पक्षातून उमेदवारी मिळेल त्या पक्षाचा झेंडा हातात घेणार’, असा पवित्रा अनेक इच्छुकांनी घेतला आहे. त्यामुळे सध्या कोथरूडमधील भाऊ, तात्या, मामा, नेते, दादा या इच्छुकांना एकच प्रश्न विचारला जात आहे, “यंदा कोणत्या पक्षातून’ निवडणूक लढवता. यावर दबक्या आवाजात…, सर्वच राजकीय पक्षांची दारे ठोठावण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात असून “वेट ऍन्ड वॉच’ असे सांगितले जात आहे.
नवीन प्रभागरचना जाहीर झाली आणि इच्छुकांची संख्या वाढू लागली. त्यात आरक्षण काय पडते याची धाकधुक असतानाच ओबीसीचा मुद्दा रेंगाळल्याने खुल्या गटातून चाचपणी सुरू होणार आहे. तीनच्या प्रभागामध्ये आपण निवडून येण्याचा ज्यांना आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडून छूपी रणनिती आखली जात आहे.
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सध्या भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, नवीन प्रभाग रचना महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्यामुळे मागील निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले अनेक इच्छुक पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीत आहेत. यासाठी प्रभागात इच्छुक आणि पक्षाची ताकद याची चाचपणी सुरू आहे.
काही इच्छुक कुंपनावर…
या पक्षात गेल्यावरच आपण निवडून येऊ शकतो, याची शाश्वती असलेल्यांनी आत्तापासून उडी मारायला सुरवात केली आहे. तर, काही इच्छुक कुंपनावर आहेत. प्रामुख भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षात चढाओढ सुरू असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील इच्छुक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत येऊ शकतात. तर ज्यांना महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी डावलली जाणार ते भाजप किंवा मनसेच्या वाटेवर असतील.