कोंढवा –राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उंड्री चौक येथे आंदोलन केले.
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय हा पूर्णपणे न्यायप्रविष्ट असताना तसेच शरद पवार यांचा या विषयाशी काहीही संबंध नसताना निव्वळ विरोधी पक्ष भाजप व वकील गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. जेव्हापासून पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे राज्यातील सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हातून गेली आहे, तेव्हापासून फडणविसांनी वेगवेगळ्या माध्यमातून पवार यांच्या बाबतीत टीका-टिप्पणी करण्यासाठी आपल्या बगलबच्चांना पुढे केले आहे, असा आरोप पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्ती बांदल यांनी केला.
उंड्री चौकात राष्ट्रवादीच्यावतीने निवृत्ती बांदल यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुभाष टकले, वसंत कड, उद्योजक दीपक बांदल, आशिष बांदल, कुंडलिक पुणेकर, सनी शिरोडे, विजय कामठे, अविनाश तळेकर, अमोल घोडके, महेश औताडे, युवराज घुले, सचिन उंद्रे, उमेश झेंडे आदी उपस्थित होते.
पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला पूर्णपणे भाजपप्रणित आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी व हल्ल्याच्या मागचे नेमके सूत्रधार शोधून काढावेत, अशी मागणी बांदल यांनी आंदोलन प्रसंगी केली.