उरुळी कांचन – इंधन दरवाढ, कोंबडीच्या खाद्यात झालेल्या दरवाढीमुळे चिकनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणारत वाढ झाली आहे. मटणाचे दर गगनाला भिडल्याने मांसाहारी चिकनकडे वळले होते. मात्र आता चिकनचे दरातही वाढ झाल्याने रविवारचा मांसाहाराचा मेनू महागला आहे.
लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री चालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या. मात्र दीड वर्षापूर्वी हेच दर 120 ते 140 रुपये प्रती किलोपर्यंत होते. आता चिकनचे दर दुप्पट झाले आहेत. 260 ते 280 रुपये प्रती किलो दराने चिकनची विक्री होत आहे.
उत्पादन आणि मागणी यामध्ये जास्त फरक नसल्याने किंमती सुद्धा स्थिर राहत होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये अनेक पोल्ट्री चालकांना फटका बसल्याने त्यांना पोल्ट्री व्यवसाय बंद करावा लागला. काही जण कर्जबाजारी झाल्याने ते पुन्हा या व्यवसायाकडे वळले नाही. सोयाबीन आणि मक्याच्या खाद्यात विक्रमी वाढ झाली आहे. पूर्वी कोंबडीच्या पालन पोषणासाठी 70 ते 80 रुपये खर्च येत होता. आता तो 110 ते 120 रुपयांवर गेला आहे. त्याचाच परिणाम भाववाढीवर झाला आहे. दरम्यान, पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्याचे दर दुप्पट झाले आहे. पक्षाच्या किंमती वाढल्याने पोल्ट्री चालक अडचणीत आले आहे. नाईलाजाने त्यांना कोंबडीचे दर वाढवावे लागले असल्याचे पोल्ट्रीचालक सांगत आहेत. बाहेरच्या तालुक्यातून कोंबड्या विक्रीस येतात. पुर्वी 80 ते 90 रुपयांना मिळणारी जिवंत कोंबडी आज 150 रुपये प्रती किलो दराने खरेदी करावी लागत आहे.
पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, वाहतूक, पक्ष्यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे चिकनचे दर वाढले आहेत. खाद्याचे दर दुप्पट झाले असल्याने पक्षांच्या सांभाळ करण्यास 100 ते 120 रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या मार्केटमध्ये चिकनचा तुटवडा आहे. हॉटेल चालक, ग्राहकांकडून मागणी कायम आहे. मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी कायम असल्याने दर वाढत चालले आहे. – डॉ. नानासाहेब गोरे, पोल्ट्रीचालक
गावरानचे दर कायम
बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकन (जिवंत कोंबडा) 500 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर डुप्लीकेट गावरान म्हणून संबोधले जाणारे जिवंत कोंबडे 280 रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे. हैदराबादी कोंबडीचे दर 360 ते 380 रुपये किलो असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.