पुणे, – शालेय शिक्षण विभागातील विविध कार्यालयातील आठ शिक्षणाधिकारी यांना अखेर अडथळ्यातुन मार्ग काढत शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांची पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आलेली आहे. तब्बल सहा महिन्यांनी महापालिकेला पुर्णवेळ प्रशासकीय अधिकारी मिळाले आहेत.
राज्यात बहुसंख्य कार्यालयातील शिक्षण उपसंचालक पदे रिक्तच पडली होती. या पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यामुळे संबंधित अधिकारी यांची डोकेदुखी वाढली होती. काही शिक्षणाधिकारी यांना पदोन्नतीची आसही लागली होती. शालेय शिक्षण विभागाने गेल्या काही महिन्यापुर्वीपासुन शिक्षणाधिकारी यांना पदोन्नती देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. काही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. सेवा ज्येष्ठतेबाबतच्या वादामुळे पदोन्नत्या लांबणीवर पडला होत्या. अखेर न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. पदोन्नती ही विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या सेवाविषयक प्रकरणांच्या निकालाच्या अधिन राहून देण्यात आलेली आहे.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत यांची जुन २०२३ च्या अखेरीस पुणे बोर्डाच्या सह्सचिव पदी बदली झाली होती. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी पदाचा अत्तिरिक्त कार्यभार महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतील उपायुक्त संजयकुमार राठोड यांच्याकडे देण्यात आला होता. आता प्रशासकीय अधिकारी पदी सुनंदा वाखारे यांची पुर्णवेळ नियुक्ती झाल्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजाला गती प्राप्त होणार आहे.
पदोन्नती मिळालेले अधिकारी व कार्यालय
सुनंदा वाखारे – प्रशासकीय अधिकारी, पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभाग , राजेश शिंदे – शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय , ज्योती शिंदे – शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, संगीता भागवत – उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद , मोहन देसले – नाशिक विभागीय शिक्षण मंडळ सचिव, प्रकाश मुकुंद – शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, सुभाष चौगुले – कोल्हापुर विभागीय शिक्षण मंडळ सचिव, संजय दोर्लीकर – प्रकल्प उपसंचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद.