तेहरान – इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संस्थेच्या एका एजंटला इराणमध्ये शनिवारी फाशी देण्यात आले. इराणच्या दक्षिण-पूर्वेकडील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये या एजंटला फाशी देण्यात आले, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
फाशी देण्यात आलेला एजंट मोसाद या परदेशी गुप्तहेर संस्थेच्या संपर्कात होता. त्याने अत्यंत गोपनीय माहितीही गोळा केली होती. त्याने काही महत्वाच्या व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित माहितीही गोळा करून मोसाद या गुप्तहेर संस्थेला पुरवली होती, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या विरोधात काम करणाऱ्या गुप्तहेर संस्थेला ही महत्वाची कागदपत्रे पुरवली गेली होती, असे जरी इराणने म्हटले असले, तरी ही माहिती नक्की कोठे दिली गेली, याचा कोणताही तपशील इराणने उघड केलेला नाही.
तसेच या गुप्तहेराला कधी अटक केली गेली आणि त्याच्यावर खटला कधी चालवला गेला हे देखील इराणने स्पष्ट केलेले नाही. मात्र या गुप्तहेराच्या सुटकेसाठीचे अपील फेटाळण्यात आले होते, असे म्हटले गेले आहे.