पुणे : लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात हद्दीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुंडाला वर्षभरासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
विवेक उर्फ विकी चंद्रकांत तेलंग (वय-२६, रा. भराडी चाळ, लोणी काळभोर) असे कारवाई केलेल्या केलेल्या गुंडाचे नाव आहे. तेलंगची नागपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. तेलंगविरुद्ध मागील ५ वर्षात खंडणी, विनयभंग, दुखापत, चोरी असे गंभीर स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता.
संबंधित प्रस्तावाला पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून शहरातील ६३ गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली आहे.